वांद्र्यामध्ये कोरोनाचा टाइमबॉम्ब! हजारो मजूर रस्त्यावर, पोलिसांचा लाठीचार्ज

मुंबई (हुसैन शेख): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचे  संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. दरम्यान लॉाकडाऊनचा पहिला टप्पा आज संपणार होता.आज लॉकडाऊन संपेल या आशेने मुंबईमध्ये राहणारे हजारो मजूर गावी जाण्यासाठी वांद्रे पश्चिम याठिकाणी आले होते. लॉकडाऊन  वाढवल्यामुळे या मजुरांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे मजुरांनी कोरोनाचं गांभीर्य लक्षात न घेता रस्त्यावर उतरण्याता निर्णय घेतला. या ठिकाणी वाढलेल्या गर्दीमुळे मोठा गोंधळ झाला आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. सध्या ही परिस्थिती आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आले आहे.


दरम्यान मंत्री आदित्य ठाकरे यांनी वांद्रे स्थानकातील गर्दी हटवण्यात आल्याचे ट्वीट केले आहे. मात्र त्यांनी केंद्राबाबत नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रांने या मजुरांना त्यांच्या घराकडे पाठवण्याची सोय न केल्यामुळे आजची वांद्रे येथील घटना किंवा सुरतमधील घटना घडल्याचं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. त्यांना अन्न किंवा निवारा नको आहे तर त्यांनी घरी जायचं आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.


त्याचप्रमाणे या सर्व प्रकरणानंतर संजय निरूपम यांनी महाविकास आघाडी सरकारवरच टीका केली आहे. वांद्रे येथे जे झाले ते होणारच होते, त्यांना खायला मिळत नाही, मूळ गावी जावून दिले जात नाही, किती दिवस ते दाबून ठेवणार?  मोफत खायला देणे म्हणजे सरकारी आकडे फक्त कागदावर फुगवटा असल्याची टीका संजय निरुपम यांनी केली आहे. 'कोणतेही सरकार किती दिवस मोफत देणार? दुसरा काही पर्याय नाही का?' असे काही प्रश्न संजय निरुपम यांनी व्यक्त केले आहेत.