बॉलिवूडच्या फोटोग्राफर्ससाठी एकता कपूरचा पुढाकार, दिली आर्थिक मदत

या आधी सलमान खान याच्यासह अनेक कलाकारांनी बॉलिवूडमधल्या कामगारांना मदत केली आहे.



मुंबई (प्रतिनिधी) : लॉकडाऊनमुळे सगळ्या देशातले व्यवहार ठप्प आहेत. काम बंद असल्याने दररोज कमाई करून पोटभरणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. याचा फटका फक्त मजुरांनाच बसला नाही तर अनेक क्षेत्रातल्या लोकांना बसला आहे. बॉलिवूडमध्ये फोटोग्राफर्सचं काम करणाऱ्या अनेक तरुण फोटोग्राफर्सना याचा मोठा फटका बसला. या फोटोग्राफर्सच्या मदतीसाठी एकता कपूरने पुढाकार घेतला आहे.


गरजवंत असलेल्या फोटोग्राफर्सच्या खात्यात एकता कपूरने पैसे टाकला असून त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसाठी तिने हा पुढाकार घेतला आहे. विरल भयानी आणि मानव मंगलानी यांनी इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून एकता कपूरचे आभार मानले आहेत. या आधी सलमान खान याच्यासह अनेक कलाकारांनी बॉलिवूडमधल्या कामगारांना मदत केली आहे.


एकीकडे सर्व सेलिब्रेटी वेगवेगळ्या संस्थांना दान करताना दिसत आहेत. गरजूंना अन्नदान करत आहेत. तर दुसरीकडे एका बॉलिवूड अभिनेता आपल्या स्टाफच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. काहीही झालं तरीही स्टाफचा पगार चुकवणार नाही पैसे नसतील तर कर्ज घेईन मात्र त्यांना सॅलरी देईन असं या अभिनेत्यानं म्हटलं आहे.


तनु वेड्स मनु, अंग्रेजी मीडियम यासारख्या सिनेमातमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता दीपक डोबरियालनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ही घोषणा केली आहे. दीपक म्हणाला, मला खरंच हैराण आहे की जर आमच्या सारख्या लोकांना या व्हायरसमुळे एवढा त्रास होत आहे. तर मग गरीब किंवा जे लोक त्यांच्या सॅलरीवर अवलंबून आहेत अशांसाठी हा किती कठिण काळ आहे.