राजस्थानमधील कोटो या ठिकाणी अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांना आणण्याची परवानगी द्या, अशी विनंती सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्र आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुंबई (प्रतिनिधी) : लॉकडाऊनमुळे कोटा (राजस्थान) येथे अडकलेल्या मुळचे महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणायला परवानगी द्या, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्र आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सोबतच या विद्यार्थ्यांना परत आणण्याची व्यवस्था युवक काँग्रेस करू शकते, अशी तयारीदेखील दर्शवली आहे. दोन दिवसापूर्वी कोटा (राजस्थान) येथे महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकल्याची व त्यांचे जेवणाचे हाल होत असल्याच्या बातम्या विविध वृत्तवाहिन्यांवर झळकत होत्या. यासंदर्भात युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी तात्काळ ट्विट करून मदतीसाठी विद्यार्थ्यांना संपर्क करण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्राचे मुळचे रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांनी सत्यजीत तांबे यांच्याशी संपर्क करुन आपल्या रोजच्या जेवणापासूनच्या इतर सर्वच अडचणी मांडतानाच स्वगृही परतण्याची सोय करण्यासाठी कळकळीची विनंती केली आहे. विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती लक्षात घेता तांबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कार्यालयाशी संपर्क करत फक्त आवश्यक त्या परवानगी द्याव्यात, अशी मागणी केली आहे. त्यांना परत आणण्याची सोय युवक काँग्रेस करू शकते अशी तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेचे जगणे सुकर करण्यासाठी रक्तदान, अन्नधान्य वाटप अशा विविध सेवा सुरूच आहेत.