कोकण विभागात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित विभागीय महसूल आयुक्त श्री.शिवाजी दौंड
नवी मुंबई (प्रतिनिधी) दि.1: निजामुद्दीन येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सामाविष्ठ झालेल्या कोकण विभागातील 200 जण आढळून आले आहेत. त्यांचा शोध झाला असून उर्वरित लोकांची माहिती घेण्यात येत आहे. असे कोकण विभागीय महसूल आयुक्त श्री.शिवाजी दौंड यांनी सांगितले.

 

श्री.शिवाजी दौंड म्हणाले की, निजामुद्दीन येथे तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात कोकण विभागातील 200 जणांची यादी प्रशासनास प्राप्त झाली असून त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील 139, रायगड जिल्ह्यातील 42, रत्नागिरी जिल्ह्यातील 3, पालघर जिल्ह्यातील 16 यांचा समावेश आहे.

 

प्रशासनास प्राप्त झालेल्या यादीतील काही लोक  बाहेरच्या राज्यात असण्याची प्राथमिक शक्यता आहे, तर उर्वरित तपास गतीने सुरु आहे. कोकण विभागात 290 कामगार छावण्या असून 30 हजार लोकांना सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्यांना वैद्यकीय सुविधेसोबतच निवारा आणि भोजनाचीही सोय करण्यात येत आहे. कोकण विभागात होणारे सर्व मोठे समारंभ रद्द करण्यात यावेत. अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. कोकण विभागात 3 महिने पुरेल असा धान्यसाठा उपलब्ध आहे. असे त्यांनी सांगितले. वृध्द व अपंग व्यक्तींसाठी काम करणा-या कामगारांसाठी पासेस देण्याची व्यवस्था स्थानिक पातळीवर करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. छावणीत ठेवण्यात आलेल्या परप्रातींयाना आवश्यक त्या सुविधा देण्याच्या सूचना ही प्रशासकीय पातळीवर करण्यात आल्या आहेत. त्यात महिला व मुलांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत गर्दी होऊ नये. यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.. 

 


ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या

मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

वितरणासाठी शासनाची कार्यपद्धती जारी

 

मुंबई, दि.1: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वयोवृद्ध, अपंग आणि एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुलभतेने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. शासनाने यासाठी एक कार्यपद्धती निश्चित केली असून त्यानुसार अशा व्यक्तींना सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ही घरपोच सेवा मिळणार आहे.

 

     वयोवृद्ध, अपंग किंवा एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर पडावे लागू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  संबंधित गरजू व्यक्तींने हेल्पलाईनवर संपर्क साधल्यानंतर ही सेवा त्यांना उपलब्ध होऊ शकेल.

 

       यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून संपर्क अधिकाऱ्यांची (नोडल ऑफिसर) नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्रनिहाय समाजसेवी संस्था निश्चित करण्यात आल्या आहे. अत्यावश्यक वस्तू जसे- अन्नधान्य, औषधे अशा बाबींचा पुरवठा करणाऱ्या संस्था या स्वयंसेवी संस्थांशी जोडण्यात आल्या आहेत.

 

     पोलीस यंत्रणेच्यावतीनेही यासाठी स्वतंत्र संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्था, सेवा पुरवठादार, औषध विक्रेते, घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्ती यांना  पोलीस यंत्रणेच्यावतीने प्रवेशपत्र देण्यात आलेले आहेत.

 

   स्वयंसेवी संस्था हेल्पलाईनवर प्राप्त झाल्याप्रमाणे वयोवृद्ध, अपंग व्यक्तींना आवश्यक ते सहाय्य करतील तसेच या व्यक्तींची यादी संबंधीत नोडल अधिकाऱ्यांना सोपवून पोलिस यंत्रणेशी समन्वय राखण्याचे काम करणार आहे. सहाय्यासाठी गरजूंना संबंधित महापालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा लागेल.  मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी 1800 221 292 ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.  ती सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहतील.  या मोहिमेसाठी राज्य समन्वयक म्हणून शासनाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे या काम पहात आहे.