कोरोनावायरस च्या प्रादुर्भावामुळे दहावीचा एक पेपर रद्द करावा लागला. आता उत्तरपत्रिका तपासणीचा मार्ग काही भागात मोकळा होईल. दहावीच्या निकाल कधी? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती...
मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनावायरस च्या प्रादुर्भावामुळे दहावीचा एक पेपर रद्द करावा लागला. दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द केल्यानंतर आता उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला हिरवा कंदील मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे शिक्षक घरीच असल्याने हा लॉकडाऊन संपल्यानंतरच उत्तरपत्रिका तपासणीचं काम हाती घेण्यात येईल, असं बोर्डाकडून सांगण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नियमित वेळेपेक्षा दोन आठवडे विलंबाने लागू शकतो.
तपासणीबाबतचं नियोजन करून निकाल वेळेवर लावायचा प्रयत्न करा, असे आदेश बोर्डाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. निकाल वेळेवरच लावायचं नियोजन केलं जाईल, पण उत्तरपत्रिका तपासायचं काम उशीरा सुरू होणार असल्याने 15-20 दिवस निकालाला विलंब होई शकतो, असंही त्या म्हणाल्या.
दहावीच्या उत्तरपत्रिकांची द्विस्तरीय तपासणी होते. परीक्षकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिका मॉडरेटरकडे देण्यात येतात. लॉकडाऊनमुळे मॉडरेटरकडे पेपर पोहोचण्यात उशीर लागणार आहे. राज्याच्या काही भागातलं कामकाज या आठवड्यात सुरू होईल. जिथे कोरोनाव्हायरचा प्रभाव कमी आहे तिथले लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. तिथे आता तपासणीचं काम सुरू होईल. लॉकडाऊन संपल्यानंतर हे काम वेगाने सुरू होईल. जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापेक्षा निकालाला विलंब लागणार नाही, असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.