ग्रीन, ऑरेंज झोनमधील उद्योग आजपासून अंशतः सुरू

राज्यात आज म्हणजे 20 एप्रिलपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उद्योग अंशत: सुरू करण्यात आले आहे. येथील उद्योगधंद्यांना अटीशर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. अशाच प्रकारे मुंबईतही काही कामांना परवानगी देण्यात येणार आहे. शहरातील कंटेनमेंट झोन वगळून बांधकाम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सोशल डिस्टन्सिंग विषयक नियमांसह अन्य बाबींचे काटेकोरपणे पालन करण्याची अट घालण्यात आली आहे. कामगारांची राहण्याची आणि दैनंदिन गरजांची सोय बांधकाम ठिकाणीच करणं बंधनकारक आहे. अटींचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे आढळून आल्यास दिलेली परवानगी रद्द होणार आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (19 एप्रिल) दुपारी सोशल मीडियाच्या माध्यमाशी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी काही ठिकाणी उद्योगांना अशंत: परवानगी देत असल्याचं त्यांनी सांगितलं. "कोरोनामुळे अर्थव्यवस्था चिखलात रुतली आहे. अर्थचक्र फिरलं पाहिजे म्हणून काही ठिकाणी मोजक्या स्वरुपात उद्योगधंद्यांना परवानगी देत आहोत. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना माफक स्वरुपात परवानगी देत आहोत," असं मुख्यमंत्री म्हणाले.