कोरोना रुग्ण संख्येनुसार महाराष्ट्राची रेड, ऑरेंज, ग्रीन या तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. परंतु राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी ही चर्चा फेटाळली आहे.
सांगली (प्रतिनिधी) : "सांगली, मुंबई, पुणे, पालघर, औरंगाबाद यांसह अन्य जिल्हे रेड झोनमध्ये गेलेले नसून तसा निर्णय अद्याप झालेला नाही. केंद्र अथवा राज्य सरकारने असे कोणतेही झोन घोषित केलेले नाहीत, पुढील आठवड्यात यासंदर्भात केंद्र सरकारच्या परवानगीने निर्णय होईल," असं स्पष्टीकरण कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिलं आहे. सांगलीतील शिवभोजन थाळी आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णाचा आढावा विश्वजीत कदम यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिलनंतरही लॉकडाऊन कायम राहणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर कोरोना रुग्ण संख्येनुसार राज्याची रेड, ऑरेंज आणि ग्रीन या तीन झोनमध्ये विभागणी केली जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु अद्याप असे कोणत्याही प्रकारचे झोन सरकार किंवा प्रशासनाकडून केलेले नाहीत, असं विश्वजित कदम यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी होणार?
देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात असल्याने सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. त्यानुसारच कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे, अशी चर्चा आहे. 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे रेड झोन, 15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोन समाविष्ट होतील. लॉकडाऊनसंदर्भात रेड झोनमधील जिल्ह्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांमध्ये खबरदारीची उपाययोजना करुन उद्योग आणि व्यवहार सुरु केले जातील असे संकेत मिळत आहेत
कोणते जिल्हे कोणत्या झोनमध्ये?
रेड झोन : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सांगली, नागपूर, औरंगाबाद
ऑरेंज झोन : रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोंदिया
ग्रीन झोन : सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली
.