वाधवान कुटुंबाचा क्वॉरन्टाईन काळ आज संपणार, कोर्टात हजर करण्याची शक्यता

बँक घोटाळ्याचा आरोप असलेले वाधवान बंधु कुटुंबासोबत लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला पोहोचलं. त्यांना पाचगणीत क्वॉरन्टाईन केलं होतं. त्यांना आज कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे



सातारा (चाँद सय्यद) : साताऱ्यात असलेल्या वाधवान कुटुंबियांचा क्वॉरन्टाईन काळ आज संपणार आहे. त्यांना आज महाबळेश्वरमधील न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचं समजतं. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पाचगणीत दाखल होतील. तपासणी करुन सकाळी दहाच्या सुमारास त्यांना महाबळेश्वरला रवान केलं जाईल.


सीबीआय कोर्टाने वाधवान कुटुंबाला 5 मेपर्यंत महाबळेश्वर न सोडण्याचे आदेश दिल्याचं कळतं. त्यामुळे आज त्यांना जामीन मिळालाच तर 5 मे पर्यंत महाबळेश्वरमध्येच राहतील. त्यांच्या हातावर होम क्वॉरन्टाईनचा शिक्का मारुन, महाबळेश्वरमधील त्यांच्या फार्म हाऊसवर क्वॉरन्टाईन केलं जाईल. होम क्वॉरन्टाईन केल्यामुळे त्यांना 14 दिवस बंगल्यातून बाहेर जाता येणार नाही.


"वाधवान कुटुंबाचा क्वॉरन्टाईन पीरियड दुपारी दोन वाजता संपत असून आम्ही ईडी आणि सीबीआयला पत्र लिहून त्यांचा ताबा घेण्याची विनंती केली आहे," अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल (22 एप्रिल) दिली होती. परंतु सीबीआयची टीम पाचगणीत अद्याप दाखल झालेली नाही.


लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबाचा महाबळेश्वरपर्यंत प्रवास
बँक घोटाळ्याचा आरोप असलेले वाधवान बंधु कुटुंबासोबत लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला पोहोचलं. महत्त्वाचं म्हणजे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीचं पत्र घेऊन वाधवान कुटुंबाने मुंबईहून महाबळेश्वरला गाडीतून प्रवास केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल झाला होता. परंतु वाधवान कुटुंबाला सीबीआयने ताब्यात घेतलं नव्हतं. वाधवान कुटुंबापैकी काही जणांना कोरोनाव्हायरसची लागण झालेली असू शकते, अशी शंका असल्याने सीबीआयने अख्ख्या कुटुंबाला क्वॉरन्टाईन करण्याचा निर्णय घेतला होता.


पोलीस आणि आरोग्य यंत्रणेत समन्वय नाही?
गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या परवानगीचं पत्र दाखवून वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये दाखल झालं होतं. त्यानंतर या सगळ्यांना एका हायस्कूलमध्ये इन्स्टिट्यूशलन क्वॉरन्टाईनमध्ये ठेवण्यात आलं. खरंतर त्यांचा क्वॉरन्टाईन काळ आज (23 एप्रिल) संपत असताना, जिल्हा पोलिस प्रमुखांनी सीबीआयला 14 तारखेला पाठलेल्या पत्रात 22 तारखेला वाधवान कुटुंबाचा क्वॉरन्टाईन पीरियड संपत असल्याचं कळवलं होतं. तर वैद्यकीय यंत्रणेने मात्र त्यांचा क्वॉरन्टाईन पीरियड 22 तारखेला संपत नसल्याचे सांगितलं. त्यामुळे सातारा पोलिस आणि आरोग्य यंत्रणा यांचा या प्रकरणात समन्वय नसल्याचं दिसून आलं.