आमदार अनिल भोसलेंच्या भावाचा लॉकडाऊनमध्ये मुंबई-पुणे प्रवास

वाधवान बंधूंसह त्यांच्या कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्याची विशेष परवानगी देण्याचं प्रकरण गाजत असतानाच आता तशाच प्रकारचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे.


पुणे  (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अनिल भोसले यांचा भाऊ नितीन भोसले यांनी लॉकडाऊन असताना मुंबई-पुणे प्रवास केल्याचं समोर आलं आहे. कुटुंबियांना मुंबईहून आणण्यास मावळचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी स्वत:च्या सहीचे पत्र दिले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्या पत्रावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. मात्र हे पत्र ज्यांच्या सही शिक्यानिशी देण्यात आलंय त्या प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी त्यांच्या कार्यालयातील कुणीतरी आधीच सही करुन ठेवलेल्या पत्राचा गैरवापर केल्याचा दावा केला आहे.


वाधवान बंधूंसह त्यांच्या कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्याची विशेष परवानगी देण्याचं प्रकरण गाजत असतानाच आता तशाच प्रकारचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. आमदार अनिल भोसले यांचा भाऊ नितीन भोसले यांच्यासह चार जणांनी प्रवास केल्याचं समोर आलं आहे. नितीन भोसले यांनी मुंबईतील वांद्रे इथल्या नातेवाईकांना आणण्यासाठी 8 एप्रिलला पुणे-मुंबई असा प्रवास केला. त्यासाठी मावळचे प्रांत संदेश शिर्के यांनी प्रवास करण्यासाठी परवानगीचे पत्र दिल्याचा दावा भोसले यांनी केला आहे. मात्र प्रांताधिकाऱ्यांनी आपण पत्रच दिलं नसल्याचं म्हटलं आहे.