लॉकडाऊनमध्ये मुंबईतून लपून-छपून कोकणपर्यंतचा प्रवास, कोरोनाच्या भीतीने गावकरी त्रस्त


सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : गावाबाहेरच्या व्यक्तींनी किंवा वाहनांनी आमच्या गावात प्रवेश करु नये असे बोर्ड कोकणातल्या अनेक गावांत अद्यापही कायम दिसत आहेत. लॉकडाऊनच्या काळात जिल्हा बंदी असतानाही अनेक मुंबईकर बंदोबस्त चुकवून वेगवेगळ्या मार्गाने कोकणात दाखल होत असल्याची माहिती समोर येत आबे. त्यामुळे अशा प्रवाशांना शोधून काढून त्याना क्वारंटाइन करण्यात गावांमधील  ग्रामपंचायतीना अनेक अडचणी येत आहेत.  मुंबईकराना रोखण्यासाठी असे बोर्ड गावांच्या सीमांवर लावले गेले आहेत. मुंबईमधल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता मुंबईहून कोकणात आलेल्या प्रवाशांना क्वारंटाइन केले नाही तर ती मोठी जोखीम ठरू शकते.


कसे येत आहेत मुंबईकर कोकणात ? 


खरं तर मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. या चेक नाक्यांवर पोलीस रात्र-दिवस तैनात आहे. तरीही रेल्वे रुळांचा आधार घेऊन, जंगलातल्या पायवाटांचा वापर करुन आणि मुंबईहून कोकणात परतणाऱ्या आंबा वाहतूक गाड्यांचा आधार घेत अनेक मुंबईकर कोकणात दाखल होत आहेत. त्यामुळे अशा प्रवाशाना रोखणं कठीण जात असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. मात्र मुंबईहून किंवा पुण्याहून कोणतीही व्यक्ती गावात आली तर त्या व्यक्तीची माहिती तातडीने पोलिसांना कळवणे त्या त्या गावच्या पोलीस पाटलांना बंधनकारक करण्यात आले आहे. अशा व्यक्तीला कमीत कमी 14 दिवसांसाठी  क्वारंटाइन करण्याचे आदेश सर्व तहसिलदाराना देण्यात आले आहेत. तरीही गावागावातून मिळत असलेल्या माहितीनुसार मुंबई पुण्यातून अद्यापही अनेक जण कोकणातल्या आपल्या घरी दाखल होत आहेत.


कोकणात कुठे आहे हाय रिस्क ?


कोकणातला रायगड जिल्हा कोरोना वर्गवारीच्या रेड झोनमध्ये दाखवण्यात आला आहे. याचं कारण म्हणजे पनवेल तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या. त्यामुळे पनवेल तालुका हा हायरिस्क झोन म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातही आतापर्यंत एका कोरोना ग्रस्ताचा बळी गेला आहे आणि रत्नागिरीत आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने रत्नागिरीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरीतील राजीवडा, साखरतर, शिवखोल,  अलसुरे ही गावं सील करण्यात आली आहेत. सिंधुदुर्गात मात्र परिस्थिती खूपच आटोक्यात आहे असं म्हणता येईल. 21 दिवसांचा लॉकडाऊन संपण्याच्या दिवसापर्यंत सिंधुदुर्गात एकही कोरोना पॉझिटिव्हची केस नोंद नाही . त्या आधी आढळलेल्या एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाला 9 एप्रिलला डिस्चार्ज देण्यात आला आहे.