लॉकडाऊनमध्ये नियम मोडणाऱ्यांना 'या' देशांमध्ये कडक शिक्षेची तरतूद

कोरोनाबाधित देशात लॉकडाऊन घोषित केलेला आहे. काही देशांमध्ये लॉकडाऊनमध्ये नियम मोडणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद केली आहे.



मुंबई  (प्रतिनिधी): जगभरात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निर्बंध उठवण्यास घाई केली तर त्याचे मोठे घातक परिणाम होतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. मात्र तरीही अनेक देशांमध्ये लॉकडाऊनचे पालन लोकांकडून होताना दिसत नाहीये. विविध देशांनी लॉकडाऊन मोडणाऱ्यांना दंड आणि जेलची शिक्षा देण्याचे नियम केले आहेत. जगभरातील जवळपास 90 देश लॉकडाऊन असून, येथे 450 कोटी लोक आपल्या घरात कैद आहेत.

भारतात पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी भारतात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. या दरम्यान देशात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहतूक, दुकानं बंद आहेत.

जगातील अन्य कोरोनाबाधित देशात देखील या दरम्यान लॉकडाऊन घोषित केलेला आहे. या ठिकाणी लॉकडाऊनमध्ये नियम मोडणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद केली आहे.


रशिया – येथे क्वारंटाईन मोडल्यास 7 वर्षांचा कारावास आणि मॅक्सिकोमध्ये आजार लपवल्यास 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे.

फिलिपाईन्स – या देशाचे राष्ट्रपती दुतेर्ते यांनी क्वारंटाईन नियम मोडणाऱ्यांना थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.



सौदी अरेबिया – लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरताना आढळल्यास 1 कोटी रुपये दंडाची तरतूद आहे. आरोग्य आणि प्रवाशाची माहिती लपवल्यास जवळपास 93 लाख रुपये दंडाची शिक्षा आहे.

पनामा –  या देशात बाहेर पडण्यासाठी पुरूष व महिलांसाठी वेगवेगळे देश निश्चित करण्यात आलेले आहेत. महिला सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 2 तासांसाठी बाहेर निघू शकतात.

कोलंबिया – या देशात आयडी नंबरच्या आधारावर बाहेर जाण्याची परवानगी आहे. ज्यांचा आयडी क्रमांक 0, 4, 7 आहे ते केवळ सोमवारी बाहेर निघू शकतात.


ऑस्ट्रिया-चेक प्रजासत्ताक – येथे बाहेर पडण्यासाठी मास्क घालणे गरजेचे आहे.