लॉकडाऊन हटवण्याची घाई महागात पडेल, WHOचा इशारा

डब्लूएचओचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी लॉकडाऊनचे निर्बंध उठवण्यास घाई केली तर त्याचे मोठे घातक परिणाम होतील, असा इशारा दिला आहे



मुंबई (प्रतिनिधी ) : जगभरात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निर्बंध उठवण्यास घाई केली तर त्याचे मोठे घातक परिणाम होतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. डब्लूएचओचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी जिनिवामधील पत्रकार परिषदेत म्हटलं की, "लॉकडाऊन हटवावं अशी सगळ्यांसारखीच आमचीही इच्छा आहे. परंतु घाईने लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला तर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होती. जर आपण योग्य पद्धतीने कोरोना व्हायरसचा सामना केला नाही तर त्याचे घातक परिणाम होतील." युरोपात कोरोनाचा मोठा फटका बसलेले देश स्पेन आणि इटली लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करत असून लोकांना कामावर जाण्याची परवानगी देत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे.

टेड्रोस एडहानोम यांनी देशाच्या प्रमुखांना योग्य उपाययोजना करत लॉकडाऊन सुरु ठेवण्याचा सल्ला दिला आहे. काही ठिकाणी कोरोनाचा फैलाव वाढत असल्याचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की, जर योग्य काळजी घेतली नाही तर खूप मोठा धोका आहे.