देशातील 'या' तीन राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव तीन राज्यांमध्ये सर्वाधिक दिसून येत आहे.



नवी दिल्ली : जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशभरातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. संपूर्ण देशातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव देशातील तीन राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. कोरोनाचे जास्तीत जास्त रूग्ण या तीन राज्यांमध्येच आहेत. याव्यतिरिक्त सर्वाधिक चिंताजनक गोष्ट म्हणजे, कोरोनामुळे देशभरात झालेल्या मृत्यूंमध्ये अर्ध्याहून अधिक मृत्यूही या तीन राज्यात झाले आहेत. या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दिल्ली यांसारख्या राज्यांचा समावेश आहे.


महाराष्ट्र


महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधितांची संख्या 2 हजार पार पोहोचली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, राज्यात 2455 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 160 लोकांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी 121 रूग्ण गेल्या 24 तासांत आढळून आले आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईबाबत बोलायचे तर येथे 92 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. तर 217 लोकांना कोरोनामुक्त करण्यात यश आलं आहे.


मध्यप्रदेश


मध्यप्रदेशमध्ये कोरोना बाधितांची संख्या 604 वर पोहोचली आहे. याव्यतिरिक्त जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे 43 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 44 लोकांनी कोरोना विरोधातील लढाई जिंकली आहे. इंदोर आणि भोपाळ शहरांमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत.


दिल्ली


दिल्ली सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, सोमवारी 356 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1510वर पोहोचली आहे. दिल्लीमध्ये आतापर्यंत 28 लोकांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. दिल्लीमध्ये 31 लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.