पुणे, पिंपरी चिंचवड सील; हवेली तालुका, बारामती नगरपरिषद हद्दही सील

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्याशिवाय लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात येणार आहेत.


पुणे (प्रतिनिधी) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण पुणे शहर मध्यरात्रीपासून बंद करण्यात आलं आहे. पुढील सात दिवसात शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने फक्त सकाळी 10 ते 12 सुरु राहणार आहेत. पुण्यात कर्फ्यूची कडक अंमलबजावणी केली जाणार असून जे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी गरजेशिवाय कुठल्याच कारणासाठी बाहेर पडू नये, असं पोलिसांनी आवाहन केलं आहे. तर, सोमवार म्हणजेच आजपासून पुणे जिल्ह्यातील लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आला आहे.


संपूर्ण पुणे महापालिकेचे क्षेत्र, पिंपरी चिंचवड महापालिकेचे क्षेत्र, संपूर्ण हवेली तालुका, शिरुर आणि वेल्हे तालुक्यांचा काही भाग आणि बारामती नगर परिषदेची संपूर्ण हद्द संक्रमणशील क्षेत्र (contempt zone) म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. हे संक्रमणशील क्षेत्र 27 एप्रिलपर्यंत सील करण्यात आलं आहे. या क्षेत्रातील कोणाही व्यक्तीला बाहेर जाता येणार नाही आणि बाहेरच्या भागात राहणाऱ्या कोणा व्यक्तीलाही या परिसरात येता येणार नाही. हे क्षेत्र वगळता इतर ठिकाणी उद्योग सुरु करायचे असल्यास ते स्थानिक कामगार किंवा कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने करावे लागणार आहेत. या संक्रमणशील क्षेत्रातील आयटी कंपन्यांनाही पन्नास टक्के कर्मचाऱ्यांसह काम सुरु करता येणार नाही. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून या आयटी कंपन्या जशा पाच ते दहा टक्के कर्मचाऱ्यांसह काम करत आहेत तसंच त्यांना इथून पुढेही करावं लागणार आहे.