अ‍ॅम्ब्युलन्स आणि ट्रॅक्टरची समोरासमोर भीषण धडक, तिघे जागीच ठार

अ‍ॅम्ब्युलन्स आणि ट्रॅक्टरची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.



नाशिक (प्रतिनिधी) : अ‍ॅम्ब्युलन्स आणि ट्रॅक्टरची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. पिंपळगाव बसवंतजवळ हा भीषण अपघात झाला आहे. सर्व मृत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील अश्याची माहिती मिळाली आहे.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत परिसरातील शिरवाडे फाट्याजवळील गोदावरी हॉटेलसमोर सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. पाचोरा (जि. जळगाव ) येथून रुग्ण घेऊन नाशिकच्या दिशेने येत असलेली अ‍ॅम्ब्युलन्स ( एम.एच 03 ए. एच 4677) आणि ट्रॅक्टरची ( एम एच 41 जी 4589) समोरासमोर भीषण धडक झाला.


अपघात इतका भीषण होता की, यात अ‍ॅम्ब्युलन्सचा अक्षरश: चकनाचूर झाला आहे. अ‍ॅम्ब्युलन्समधील अजिजाबी मोईद्दिन बागवान (वय-60), रफिऊद्दिन मोईद्दिन बागवान (वय-55) तर कमरूबी मोहिनोद्दिन बागवान (वय-60, सर्व राहणार बाहेरपुरा, पाचोरा जि. जळगाव) हे जागेवरच ठार झाले. तर अ‍ॅम्ब्युलन्स चालक सागर भिकन पाटील हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तर पिंपळगाव बसवंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतांचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नाशिक येथील नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.