अभिनेता पूरब कोहलीसह संपूर्ण परिवार कोरोनामुक्त, 'हे' घरगुती उपाय फायद्याचे ठरले, पूरबची इन्स्टा पोस्ट

पूरब कोहलीसह त्याची पत्नी आणि दोन मुलांना कोविड19 ची लागण झाली होती. मात्र आता सर्वजण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पूरब कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करत दिली आहे.



मुंबई (प्रतिनिधी): बॉलिवूड अभिनेता पूरब कोहली आणि त्याच्या संपूर्ण परिवाराला कोरोनाची लागण झाली होती. एअरलिफ्ट आणि रॉकऑन सारख्या सुपरहिट चित्रपटामध्ये अभिनय केलेल्या पूरब कोहलीसह त्याची पत्नी आणि दोन मुलांना कोविड19 ची लागण झाली होती. मात्र आता सर्वजण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पूरब कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करत दिली आहे.

पूरब कोहलीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आम्हाला पहिल्यांदा फक्त फ्लूची लक्षणं दिसून आली होती. ही लक्षणं आधी नॉर्मल भासली होती. खोकला देखील येत होता आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. माझी मुलगी इनायाला सगळ्या आधी ताप आला होता. दोन दिवस खोकला आणि सर्दीचा त्रास होता. तर बायको लूसीला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यानंतर खोकला आणि बाकीची लक्षणं मला आणि माझ्या मुलाला देखील दिसू लागली.


यानंतर आम्हाला सर्वांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं. आम्ही आमच्या डॉक्टरांना संपर्क केला आणि फोनवरुन संपर्कात राहून औषधं घेतली. आता आम्ही सर्वजण कोरोनामुक्त झालो आहोत, असं पूरब कोहलीने म्हटलं आहे.


तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतोय की, या दरम्यान आम्ही सोपे घरगुती उपाय देखील केले. जसं मीठ टाकून कोमट पाण्यानं गार्गल करणं, आले, हळद, मध, सुंठ याचा काढा घेणे. तसेच आम्ही गरम पाण्याच्या वाफा देखील घेतल्या. सोबतच गरम पाण्याच्या बाटल्यांनी छाती शेकून घ्यायचो. या सर्व गोष्टींचा देखील आम्हाला उपयोग झाला. पूरबनं सांगितलं की, मी आपल्यासोबत ही माहिती यासाठी शेअर करत आहे कारण आपण कोरोना झाल्यावर घाबरुन जाऊ नका. मागील आठवड्यात आम्ही सर्वजण सेल्फ क्वॉरंटाईनमधून बाहेर आलो. आता आम्हाला कोरोना नाही, असं देखील पूरब म्हणाला.