मुंबईच्या वांद्रे स्टेशन बाहेर आज दुपारी परराज्यातील नागरिकांनी, मजुरांनी मोठी गर्दी केली होती. हजारोंच्या संख्येने हे मजूर जमल्याने कायदासुव्यवस्थेचा प्रश्न याठिकाणी निर्माण झाला होता. यावरून मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई (प्रतिनिधी): लॉकडाऊनदरम्यान मुंबईतील वांद्रे स्टेशनबाहेर जमलेली गर्दी घरी परतण्याची मागणी करत आहे. याठिकाणी जमलेले सर्व मजुरी उत्तर प्रदेश, बिहार अशा परराज्यातील आहेत. हे कामगार गेल्या 21 दिवसांपासून इथे थांबले आहेत, हातात काम नाही. त्यामुळे त्यांची दोन वेळच्या जेवणाचीही गैरसोय होत आहे. यावरून मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटलं की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परराज्यातील मजुरांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठीचा मुद्दा उपस्थित केला होता. वांद्रे रेल्वे स्टेशन बाहेरील सध्याची स्थिती सध्या नियंत्रणात आहे. सूरतमध्ये काही दिवसांपूर्वी काही मजुरांनी दंगे केले होते. मात्र त्यांनाही घरी पोहोचवण्याबाबत केंद्र सरकार अद्याप कोणताही निर्णय घेऊ शकलेलं नाही. आज वांद्रे स्टेशनबाहेर जमलेले मजुर जेवण किंवा राहण्याच्या व्यवस्थेची मागणी करत नाहीत, तर त्यांना घरी जायचं आहे."