राज्य महामार्गावर आज मध्यरात्रीपासून टोलवसुली सुरु, माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर टोल

राज्य महामार्गावर टोलवसुलीची अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने रविवारी जारी केली आहे. त्यानुसार आज मध्यरात्रापासून माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील टोलवसुली सुरु होणार आहे.



मुंबई (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर टोलवसुली बंद करण्यात आली होती. आज मध्यरात्रीपासून ही टोलवसुली माल वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रविवारी याविषयीची अधिसूचना जारी केली आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशानुसार 29 मार्चच्या मध्यरात्रीपासून टोलवसुलीला स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती रद्द करण्याच्या सूचना आता देण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्या आहेत.



राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोलनाक्यांवर 20 एप्रिलपासून टोल वसुली सुरु करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आले आहेत. शुक्रवारी, 17 एप्रिल रोजी प्राधिकरणाने हे आदेश जारी केले असून या आदेशानुसार आता देशभरातील टोलनाक्यांवर खासगी तसेच व्यावसायिक वाहनांकडून टोलवसुली सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


प्राधिकरणाच्या आधीच्या निर्णयानुसार 15 एप्रिलपासून ही टोलवसुली सुरु करण्यात येणार होती. मात्र त्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे 15 एप्रिलला पुन्हा टोल माफ करण्यासंदर्भातील अधिसूचना काढली होती.