रेशन दुकानदारांना सावधान, गैरप्रकाराची तक्रार आल्यास थेट पोलिसात गुन्हा : सोलापुर


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब लोकांना अन्नधान्याची अडचण होऊ नये म्हणून शासनाने रेशन दुकानांच्या माध्यमातून अन्नधान्य पुरवठा उपलब्ध करून दिला आहे. मात्र आदेशानुसार अन्नधान्य न देता कमी धान्य दिल्याची तक्रार सोलापुर जिल्ह्यातील काही रेशन दुकानदारांबद्दल करण्यात आली होती. यावर त्वरित कारवाई करत तीन दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले तर 3 दुकानदारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. माढा तालुक्यातील 2 तर बार्शी तालुक्यातील एका रेशन दुकानदाराचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर शहरातील तीन दुकानदारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. दरम्यान आता जर रेशन दुकानदारांविरुद्ध तक्रार आल्यास थेट पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. फौजदारी कलम तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि अन्न पुरवठा सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. तसेच जिल्हयात मुबलक प्रमाणात अन्नधान्य साठा तसेच भाजीपाला आणि घरगुती गॅस उपलब्ध असून नागरिकांनी काळजी करू नये असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.