मौलाना साद यांच्या दोन नातेवाईकांना कोरोना झाला आहे. त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत.
नवी दिल्ली : तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर आणखी नवं कलम लावलं आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. मरकजमध्ये गर्दी जमवून नियमांच उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर आधीच गुन्हे दाखल करण्यात आले होते. अशा प्रकारचं वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे. मौलाना साद यांच्या दोन नातेवाईकांना कोरोना झाला आहे. त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्याचंही सांगितलं जात आहे. हे नातेवाईक उत्तर प्रदेशातून दिल्लीत मरकजमध्ये आले होते.
मार्च महिन्यात दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या कार्यक्रमात देश विदेशातून हजारो लोक जमले होते. देशभर लॉकडाऊनची स्थिती असताना एवढ्या लोकांना मशिदीत ठेवल्यामुळे देशभर वादळ निर्माण झालं होतं. या कार्यक्रमाला अनेक देशांमधून प्रचारक आल्याने तिथे असलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली.
हे लोक कार्यक्रमानंतर आपापल्या गावी देशभर गेले त्यामुळे झपाट्याने कोरोना देशभर पसरला घटनेच्या त्या दिवसांपासून साद हे बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
देशात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. दररोज रुग्णांचा आकडा वाढत आहे. देशात आत्तापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 11,933वर गेली आहे. तर 392 जणांचा मृत्यू झालाय. 1344 जण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1 हजार 118 नवीन प्रकरणे तर 24 तासांत 39 जणांचा मृत्यू झाला. चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर जगातल्या ज्या मोजक्या देशांनी उपाय योजना सुरू केली त्यात भारताचा समावेश होता असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे.
ते म्हणाले, चीनमध्ये 7जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर 8 जानेवारीला आम्ही तज्ज्ञांची बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आणि उपाय योजनांना सुरुवात केली असा दावाही त्यांनी केला आहे.