Corona विरोधात ट्रम्प यांचं फेव्हरेट गेम चेंजर औषध घातक ठरलं तर... महाराष्ट्रापुढे यक्षप्रश्न

अँटी मलेरिया औषध Hydroxychloroquine चे कोरोनाव्हायरस रुग्णांवर साईड इफेक्ट दिसून आलेत.



मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाव्हायरसविरोधात लढ्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं फेव्हरेट औषध महाराष्ट्रातही वापरण्याची योजना राज्य सरकार करत आहे, मात्र आता या औषधाचे दुष्परिणाम समोर येऊ लागलेत. त्यामुळे धारावीसारख्या झोपडपट्टी परिसरात कोरोनाव्हायरसचा उद्रेक रोखण्यासाठी एकमेव आशेचा किरण असलेल्या या औषधाच्या वापरावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.


हायड्रोक्सिक्लोरोक्विन (Hydroxychloroquine) आणि अझिथ्रोमायसिन (Azithromycin) एकत्रित दिल्याने त्याचे साईड इफेक्ट होतात, असं जगभरातील तज्ज्ञांनी म्हटलं आहे. यामुळे कार्डियाक एरिथमियास (Cardiac arrhythmias) म्हणजे हृदयाच्या अनियमित ठोक्यांची समस्या उद्भवत असल्याचं दिसून आलं आहे, याबाबत CNBCTV18 मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे.


HCQS चे काय side effects होत आहेत?


स्वीडनच्या रुग्णालयात या औषधाचं क्लिनिकल ट्रायल होत असलेल्या रुग्णांना हे औषध घेतल्यानंतर डोकेदुखी, वेदना जाणवू लागल्या, तसंच त्यांच्या डोळ्यांची दृष्टीही जाऊ लागली. या औषधामुळे 100 पैकी एका रुग्णाच्या हृदयाचे ठोके अधिक जलद किंवा अधिक कमी होत होते. यानंतर हे क्लिनिकल ट्रायलही थांबवण्यात आलं.


यूएसमध्ये सिनाई ग्रेस आणि हेन्री फोर्ड हॉस्पिटलने केलेल्या अभ्यासानुसार फक्त सपोर्ट सिस्टमवर असलेल्या आणि हे औषध घेणा-या रुग्णांच्या मृत्यू दरात फारसा फरक दिसून आलेला नाही. मृत्यू दर कमी करण्यात या औषधाचा काही फायदा नाही. सायन्स डेलीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या कॅनडीयन मेडिकल असोसिएशन जर्नलमधील संशोधनानुसार, हायड्रोक्सिक्लोरोक्विनचे बरेच दुष्परिणाम होऊ शकतात.


कार्डियाक एरिथमियासशिवाय हायपोग्लेसमिया (hypoglycemia) म्हणजे लो ब्लड शुगर, हेल्युसिनेशन (hallucinations) म्हणजे भास होणे अशा समस्या उद्भवू शकतात. शिवाय हे विषारीदेखील ठरू शकतं.


जगभरातील तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता


ब्रिटनमध्ये गंभीर रुग्णांसाठी हे औषध वापरण्यास मंजुरी आहे, मात्र क्लिनिकल ट्रायल पूर्ण होईपर्यंत डॉक्टरांनी हे औषध घेण्याचा सल्ला रुग्णांना देऊ नये अशा सूचना देण्यात आल्यात. फ्रेंच सरकारनंही गंभीर प्रकरणाव्यतिरिक्त हे औषध वापरण्यास मनाई केली आहे.


अमेरिकेत या औषधाला सरकारने आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे, तरी संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ आणि सरकारचे वरिष्ठ सायंटिफिक सल्लागार डॉ. अँथनी फॉसी यांनी या औषधाच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली आहे. हे औषध वापरण्यात घाई केली जाते आहे, ते वापरण्यासाठी सुरक्षित आहे, याचे ठोस पुरावे मिळायला हवेत.


कॅनडातील सनीब्रूक हेल्थ सायंसेस सेंटरच्या डिव्हीजन ऑफ क्लिनिकल फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी विभागाचे डॉ. डेव्हिड जुर्लिंक म्हणाले, "Covid-19 च्या रुग्णांवर उपचारासाठी हे औषध वापरण्यापूर्वी ठोस पुराव्यांची गरज आहे"


मेयो क्लिनिकच्या विंडलँड स्मिथ राइस जेनेटीक हार्ट रिदम क्लिनिकचे संचालक आणि जेनेटीक कार्डिओलॉजिस्ट डॉ. मायकेल एकेरमेन CNBC शी बोलताना म्हणाले, "HCQS हे औषध 90% लोकांसाठी सुरक्षित असू शकतं, तरी हृदयाच्या आजारांचा धोका असलेल्यांसाठी हे घातक ठरू शकतं. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, HCQS आणि Azithromycin वर असलेल्या कोरोना रुग्णांच्या हृदयावर दुष्परिणाम होण्याचा धोका आहे"


त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार जर कोरोनावर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून हे औषध वापरण्याची योजना आखत असेल तर त्याचा पुनर्विचार व्हावा असं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे.