कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढणारा इरफान खान मजूरांसाठी करणार 'हे' काम

कोरोनाशी संपूर्ण जग लढत आहे. भारतातही कोरोना फोफावत आहे. अशातच कोरोना विरूद्धच्या लढाईत मदतीसाठी अनेक सेलिब्रिटी सरसावले आहेत.



मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगासह देशातही पाहायला मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला असून यामुळे अनेक गरजू लोकांचे हाल होत आहेत. लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम ज्यांचं पोट हातावर आहे, अशा लोकांना बसला आहे. अशातच अनेक मजूरांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत झाल्याचं दिसून येत आहे. अशातच या मजूरांच्या मदतीसाठी अनेक सेलिब्रिटी धावून आले आहेत. आता या सेलिब्रिटींमध्ये अभिनेता इम्रान खानचंही नाव जोडलं गेलं आहे.


इरफान खानने मजूरांना मदत करणार असल्याची माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. त्याने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'त्याला या मजूरांसाठी काही खास करण्याची इच्छा आहे. या पोस्टमध्ये त्याने एक फोटो शेअर केला आहे. त्यावर लिहिलं आहे की, प्रवासी मजूरांसोबत जे झालं त्यांचा पश्चाताप करण्यासाठी तो शुक्रवारी 10 एप्रिलला उपवास ठेवणार आहे. हा उपवास सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे.'


स्वतः कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढत असताना इरफान खानने या मोहिमेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्याने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, 'मी याचं समर्थन करतो, कारण मला वाटतं की, हा बदल मुळांपासून सुरू झाला पाहिजे.'


दरम्यान, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कोरोना विरूद्धच्या लढ्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. सलमान खानने फिल्म इंडस्टिशी निगडीत मजूरांना आर्थिक मदत दिली आहे. अमिताभ बच्चन, शाहरूख खान यांनी मदत करणार असल्याची घोषणा केली होती. दोघांनीही आपल्या ट्वीटमार्फत याबाबत माहिती दिली होती. तर अजय देवगण आणि रोहित शेट्टीने प्रत्येकी 51 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. यांच्याव्यतिरिक्त इतरही बॉलिवूड सेलिब्रिटी मदतीसाठी समोर आले आहेत. सलमान खानने FWICE मार्फत 25000 मजूरांच्या बँक खात्यांचे नंबर्स मागितले आहे. त्यांना थेट त्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यात येणार आहेत. तसेच बॉलिवूड स्टार अक्षय कुमारने पीएम केअर फंडसाठी 25 कोटी रूपये मदत केली आहे. तर कार्तिक आर्यन आणि विक्की कौशलनेदेखील प्रत्येकी एक कोटी रूपयांची मदत केली आहे.