- अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना 32 मराठी कलाकारांनी घरबसल्या तू चाल पुढं तुला रं गड्या या गीतावर व्हिडीओ करून हे गाणं बनवलं आहे.
- राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही या गाण्याबद्दल ट्विट करत कलाकारांचं कौतुक केलं आहे.
मुंबई (प्रतिनिधी): काही दिवसांपूर्वी मराठी कलाकारांनी मिळून एक व्हिडिओ तयार केला होता. तू चाल पुढं.. या गाण्याचा तो व्हिडीओ होता. या गाण्यातून अत्यावश्यक सेवेत काम कऱणारे पत्रकार, डॉक्टर, नर्सेस, शेतकरी आदी सगळ्यांना सलाम केला होता. या व्हिडीओमध्ये सुबोध भावे, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, ह्रता दुर्गुळे आदी अनेक कलाकार सहभागी आहेत. या गाण्याला प्रतिसादही मोठा मिळाला. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही या गाण्याबद्दल ट्वीट करत कलाकारांचं कौतुक केलं आहे.
कलाकारांनी घेतलेल्या या कष्टाची नोंद घेत रोहित पवार यांनी सर्वच कलाकारांचं कौतुक केलं आहे. अंगावर रोमांच आणणारे असे हे गाणे आहे असं सांगत त्यांनी ट्विट केलं आहे. पण इतकच ट्विट करून न थांबता त्यांनी मराठी सिनेसृष्टीच्या या कलाकारांकडून एक अपेक्षाही व्यक्त केली आहे. केवळ एखादं गाणं करून न थांबता कलाकारांनी आपल्या पदरचा निधी देऊन सरकारला कोरोनाला हरवण्याच्या कामी हातभार लावावा असंही म्हटलं आहे. वास्तविक हातभार हा शब्द असताना ट्वीट करताना पवार यांनी हात 'भार' असं म्हटल्यामुळे सरकारवर येणारा भार कलाकारांनी भरीव मदत देऊन उचलावा अशी अपेक्षा ते व्यक्त करत असावेत.