मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रापुढे उभं ठाकलेल्या याक संकटातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने एक नवीन समिती स्थापन केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे.
राज्यावरील कोरोना संकटाचा सर्वस्तरावर प्रभावी मुकाबला करुन कोरोनाला संपवणं, ठप्प पडलेल्या राज्य अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करणं, राज्याची आर्थिक, औद्योगिक, सामाजिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात मंत्रिमंडळ सदस्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.
ही समिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रभावी उपायोजना करणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील , महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा, स्थानिक स्वराज संस्था, शासनाच्या विविध यंत्रणां युद्धस्तरावर काम करत आहेत. त्यांच्या लढाईल बळ देण्याचं कामही ही समिती करणार आहे.
राज्यात 24 मार्चपासून टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसाय, व्यापार क्षेत्र ठप्प झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याची अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करणे आणि राज्याला पुन्हा आर्थिक सुस्थितीत आणण्यासाठी 11 तज्ञ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीने सुचवलेल्या उपाययोजनांवरही ही मंत्रिमंडळसमिती निर्णय घेणार आहे.