तबलिगी जमातच्या लोकांनी माफी मागावी; काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांची मागणी

दिल्लीत तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्याचं बोललं जात आहे. या कार्यक्रमावरुन काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी तबलिगी जमातीच्या आयोजकांवर टीका केली आहे.



नवी दिल्ली : तबलीगी जमातच्या घटनेवर काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी कडक आणि परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. या घटनेवर तबलिगी जमातीच्या लोकांनी माफी मागावी, असं आवाहन दलवाई यांनी केलंय. सरकारच्याही अनेक चुका झाल्या, पण सरकारवर टीका करण्याची ही वेळ नाही. पहिली लढाई कोरोनाशी आहे. विदेशातून आलेले लोक कसे काय फिरत होते. या गोष्टीचे समर्थन कुठल्याही पद्धतीने होऊ शकत नसल्याचे ते म्हणाले. मरकजमध्ये मार्च महिन्यात एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तोच कार्यक्रम देशात कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा प्रमुख स्रोत बनल्याचे बोलले जात आहे. COVID-19 च्या पार्श्वभूमीवर निजामुद्दीच्या मरकजमध्ये सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. परंतु, या आदेशाचं उल्लंघन करत कार्यक्रमाचं आयोजन झालं.


कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये अशी सूचना देण्यात आली आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, जेणेकरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर खबरदारी म्हणून धार्मिक स्थळं बंद करण्यात आली आहेत. तरीही या कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि त्यामधून कोरोनाचा संसर्गही झाला. दिल्लीतील मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावरुन मौलाना मोहम्मद साद कांधलवी आणि तब्लिगी जमातच्या इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामारी कायदा 1897 आणि भारतीय दंड विधानांच्या कलमांनुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे.


काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांची टीका
तबलीगी जमातच्या घटनेवरुन काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी टीका केलीय. तबलिगी जमातीच्या लोकांनी यावर माफी मागावी, असं आवाहनही त्यांनी केलंय. हा प्रश्न हिंदु-मुस्लीम नाही त्याच्याशी एकत्रित लढलं पाहिजे. मुस्लीम समाज जनजागृती करण्यात कमी पडला हे कबूल करायला हवं. 800 जमात कार्यकर्त्यांचे विसा बॅन केले याचंही समर्थन हुसेन दलवाई यांनी केलं आहे.


तबलिगी जमात म्हणजे काय?
सुन्नी पंथीयांची धर्म प्रसार करणारी संघटना आहे. जागतिक पातळीवर सुन्नी मुस्लिमांचे संघटन करणे आणि सुन्नी पंथाचा विस्तार करणे हे जमातचे मुख्य उद्दिष्ट. सुन्नी पंथाकडे चला हा त्यांचा नारा आहे. 1927 मध्ये भारतातच म्हणजे मेवातमध्ये मोहम्मद इलियास यांनी तबलिगी जमातची स्थापना केली. 20 व्या शतकातील मुस्लीम जगतात हे सर्वात प्रभावी धर्म संघटन समजले जाते.