हापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, रत्नागिरीतून 5 हजार पेट्या रवाना

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हापूसबाबत दिलासादायक बातमी आली आहे. 'आत्मा'तर्फे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हापूससाठी थेट शेतकरी ते ग्राहक अशी साखळी योजना केली आहे.

  • राज्याच्या अनेक ठिकाणच्या बाजारात हापूसच्या पेट्या दाखल झाल्या आहेत.



रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातला हापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. पण, त्याला आता काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कारण, 1 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत तब्बल 5 हजार हापूसच्या पेट्या या रत्नागिरी जिल्ह्यातून राज्याच्या अनेक ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये रवाना झाला आहे. थेट शेतकरी ते ग्राहक अशी ही साखळी योजना तयार करण्यात आली आहे. प्रति डझन जवळपास 350 रूपये असा दर सध्या हापूसला मिळत आहे.


आत्मा अर्थात अग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सीनं केलेल्या पुढाकारामुळे ही बाब शक्य झाली आहे. पंढरपूर, फलटण, सातारा, कराड, पुणे, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या ठिकाणी या पेट्या रवाना झाल्या आहेत. दरम्यान, आंबे घेतल्यानंतर पैसे देखील थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. जिल्ह्यातल्या जवळपास सर्वच तालुक्यांमधून या पेट्या रवाना होताना दिसत आहे. शिवाय, हा आकडा दिवसेंदिवस वाढेल अशी देखील आशा आहे. मोठ्या बागायतदारांचे स्वताचे नेटवर्क असताना छोटे आंबा बागायतदार आणि शेतकरी यांना मात्र अनेक अडचणी येत होत्या. पण, त्यांच्या मदतीला 'आत्मा' विभाग धावून आला आहे.


लांबलेला पावसाळा, आणि त्यानंतर हमावानाचा लहरीपणा यामुळे आंबा उत्पादक संकटात होता. त्यामध्ये परत कोरोनाची भर पडली. अशी वेळी सगळं काही संपलं असं वाटत असताना आत्मा विभागानं घेतलेल्या पुढाकारामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांना या संकटाच्या काळात देखील काही प्रमाणात का असेना दिलासा मिळताना दिसत आहे.


आंबा सडण्याची भीती

दुसरीकडे रत्नागिरी आणि देवगडचा हापूस सध्या मोठ्या अडचणीत सापडलाय. देवगडमधील आंबा व्यावसायिक प्रचंड अडचणीत आलाय. आतापर्यंत फक्त 15 ते 20 टक्के आंबा मार्केटमध्ये दाखल झालाय. तब्बल 80 टक्के आंबा अजूनही बागेत शिल्लक आहे. यावर्षी रत्नागिरी आणि देवगड हापूसला चांगला दर असूनही कोरोनामुळे बाजारपेठ उपलब्ध होत नाही आहे. फेब्रुवारीमध्ये मुंबई मार्केटमध्ये दाखल झालेल्या आंब्याला चांगला भाव होता.  मात्र, मार्चमध्ये लाॅकडाऊनमुळे आंबा बाजारात गेलाच नाही. दरवर्षी अडीचशे ते तीनशे कोटींची देवगड हापूसची उलाढाल होते. रत्नागिरी आणि देवगडमधील सर्व बागायतदार आंबा पाठवायचा कुठे ? या विवंचनेत आंबा बागायतदार आहेत. खरंतर देवगड आंबा हा जगप्रसिद्ध आहे. देश विदेशात याला खूपच मागणी आहे. पण सध्या देशांतर्गत व देशाबाहेरील वाहतूक सध्या बंद आहे. यामुळे परदेशात आंबा जाईल की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. शेतकरी व बागायतदार चिंताग्रस्त झाला असून शासनाने आता नुकसान भरपाई देवून या शेतकरांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे.