आज आढळलेल्या 12 रुग्णांमध्ये काही जण हे कोरोनाबाधित रुग्णांचा संपर्कात आल्यामुळे बाधित झाले आहे.
डोंबिवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. मुंबईच्या उपनगरातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कल्याण - डोंबिवलीमध्ये 5 दिवसांत 37 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
आज कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यातील डोंबिवलीमधील 8 तर कल्याण परिसरातील 3 आणि आंबिवलीमधील एका रुग्णांचा समावेश आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आतापर्यंत एकूण 97 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. यापैकी 33 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. सर्वाधिक रुग्ण हे डोंबिवलीमध्ये आढळले आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
आज आढळलेल्या 12 रुग्णांमध्ये काही जण हे कोरोनाबाधित रुग्णांचा संपर्कात आल्यामुळे बाधित झाले आहे. तर काही जण हे डायलिसिसवर उपचार घेत होते. तसंच यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा आणि शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकांचाही समावेश आहे.
आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांपैकी 29 रुग्ण निऑन हॉस्पिटल येथे आणि शास्त्रीनगर रुग्णालय डोंबिवली येथे 11 रुग्ण उपचार घेत असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. उर्वरीत रुग्ण हे मुंबई येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.