धारावीत उद्रेक: 12 तासांमध्ये मिळाले 15 कोरोना रुग्ण, संख्या 101वर

धारावीतला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने मिशन धारावी ही मोहिम सुरू केली असून तिथल्या तब्बल साडेसात लाख लोकांचं स्क्रिनिंग करण्याची सरकारची योजना आहे.



मुंबई (प्रतिनिधी):  धारावी हे मुंबईतलं कोरोनाचं मोठं हॉटस्पॉट बनलं आहे. दररोज रुग्ण सापडण्याच्या संख्येत वाढ होत आहे. धारावीमध्ये आज कोरोनाचे नवे 15 रुग्ण आढळले. त्यामुळे धारावीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुस्लिम नगरमध्ये  सर्वात 21 रुग्ण आहेत. तर त्यानंतर मुकुंद नगरमध्ये 18 रुग्ण आहे. धारावीतला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने मिशन धारावी ही मोहिम सुरू केली असून तिथल्या तब्बल साडेसात लाख लोकांचं स्क्रिनिंग करण्याची सरकारची योजना आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये हे स्क्रिनिंग पूर्ण होणार आहे.


राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गुरुवारी कोरोनाबाधित 286 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण रुग्ण संख्या 3202 झाली आहे. दिवसभरात 5 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 300 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


राज्यात 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे 3, पुण्यातील 4 आहेत. त्यापैकी 5 पुरुष तर 2 महिला आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 194 झाली आहे.  मृत्यूमुखी पडलेल्या 7 जणांपैकी 6 रुग्णांमध्ये ( 86 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.


प्रयोगशाळेत आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 56 हजार 673 नमुन्यांपैकी 52 हजार 762 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 3202 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 71,076 लोक होमक्वारंटाईनमध्ये असून 6108 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


महाराष्ट्र राज्यात कोरोना मुळे होणाऱ्यां मृत्यूचा दर हा देशातील इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. या मृत्यूंची कारणमीमांसा आणि उपाययोजना करण्यासाठी तसेच जिल्हा पातळीवर रुग्णोपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरावर तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष दल (टास्क फोर्स ) स्थापन करण्यात आले आहे. यामुळे राज्यात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी एक हॉटलाईन उपलब्ध होणार आहे.