महाराष्ट्र राज्य सायबर विभागाकडून वांद्रे गर्दी प्रकरणात चुकीची माहिती पसरवणारी 30 अकाऊंटची ओळख पटविण्यात आली आहे. ही माहिती ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, टिकटॉक आदी माध्यमांच्याद्वारे पसरवण्यात आली आहे.
मुंबई (उमेश यादव) : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातही मुंबईतील आकडा झपाट्याने वाढत आहे. काल मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर परराज्यातील वास्तव्यास असलेल्या मजुरांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या गावी जाण्यासाठी ट्रेन सोडाण्यात येणार असल्याची चुकीची माहिती त्यांना मिळाली होती. मात्र या अफवेमुळे मोठे संकट उभे राहिले. काहींनी समाज माध्यमांवर पसरवलेल्या अफवेमुळे कोरोनाचा धोका असताना वांद्रे स्थानकात 1 ते 2 हजार मजूर एकत्र जमा झाले होते.
पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे. 14 एप्रिल पासून ट्रेन नेहमी प्रमाणे धावतील, अशी चुकीची माहिती ज्या 11 मार्गांनी पसरवली गेली त्याची माहिती व ज्या समाज माध्यमांचा गैरवापर केला गेला त्या अकाऊंटची माहिती पोलिसांना मिळाली आहे. लवकरच या अकाऊंटवर कायदेशीर कारवाई सुरू होईल, असं सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य सायबर विभागाकडून असे 30 अकाऊंटची ओळख पटविण्यात आली आहे. या अकाऊंटच्या माध्यमातून वांद्रे येथे रेल्वे सेवा सुरू करण्याची अफवा पसरवण्यात आली होती. अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर विभाग यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. राज्यामध्ये काही गुन्हेगार, समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर, याच समाजकंटकांना पकडण्यासाठी राज्यात सर्वत्र समन्वय ठेवून आहे. महाराष्ट्र सायबर विभाग टिकटॉक , फेसबुक , ट्विटर आणि अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे.
कोरोनाच्या या जीवघेण्या आजाराच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांचा वापर करताना अधिक सजग राहणे आवश्यक आहे. वांद्रे येथील ट्रेनची अफवा 30 अकाऊंटवरुन पसरवण्यात आली होती. काही समाज कंटक या परिस्थितीचा फायदा उचलत समाजात वितुष्ट निर्माण करू पाहत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सायबर सेल अशा स्वरुपाच्या अफवा रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्र सायबर अशा प्रकारच्या फेक न्यूजकडे लक्ष देऊन आहेत. ही अफवा फेसबुक, ट्विटर, टिकटॉक, इन्स्टाग्राम आणि इतर माध्यमांवरही लक्ष ठेवले जात आहे.
अशा प्रकारची अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन पाहून त्या भागातील पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. 14 एप्रिल 2020 पर्यंत विविध पोलीस ठाण्यात 201 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.
बीड - 26
कोल्हापूर - 15
पुणे ग्रामीण - 11
मुंबई - 10
सांगली - 10
जळगाव - 13
सातारा - 7
नांदेड - 7 आदी विविध जिल्ह्यांमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे. यामधील आरोपींविरोधात कोविड - 19 संदर्भात चुकीची बातमी पसरवणे, दोन समुदायामध्ये वितुष्ट निर्माण करणे आदी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामधील 99 केसेस व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फेक न्यूज पसरवण्यांविरोधात आहेत. आतापर्यंत 35 जणांना अटक करण्यात आली असून वांद्रेतील रेल्वेची अफवा पसरवण्यामागे 30 अकाऊंट जबाबदार असल्याचे समोर आले आहे.
सोशल मीडिया वापरावयाच्या काही नियमावली
-कोणतीही फेक न्यूज वा अफवा शेअर करू नये
-अशा फेक न्यूज पसरवण्याविरोधात जवळील पोलीस ठाण्यात तक्रार करा
-कोणतीही पोस्ट शेअर करण्यापूर्वी सत्यता पडताळून घ्या
-अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा
-अधिकृत माहिती नसल्यास अशा आशयावर विश्वास ठेवू नये व तो शेअर करू नये