यापूर्वी भारतात अग्रगण्य असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा यांनी कोरना विरूद्धच्या लढ्याला मदत केली आहे. त्यांनी आपला संपूर्ण पगार कोरोनासाठीच्या उपाययोजनांसाठी लागणाऱ्या निधीला देण्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी आपल्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट करत ही माहिती दिली आहे. एवढचं नाहीतर आपल्या सहकाऱ्यांनाही आपला पगार निधी म्हणून देण्याचं आवाहन केलं आहे. तसेच पुढील महिन्यामध्ये आणखीन काही घोषणा करणार असल्याचेही महिंद्रा यांनी स्पष्ट केलं आहे.
आनंद महिंद्रा यांनी कोरोनासाठीच्या लढ्याला निधी दिल्यानंतर आता वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी करोनापासून बचाव करण्यासाठी 100 कोटींचा मदतनिधी देत असल्याची घोषणा केली आहे. तर पेटीएमचे संस्थापक विजय शर्मा यांनी करोनाच्या लसीवरील संशोधकानासाठी 5 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विटवरुन कोरोनासाठी मदत करणार असल्याची घोषणा केली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'मी या महामारीविरोधात लढण्यासाठी 100 कोटी रुपये देण्याचे वचन देतो. आम्ही देशाला दिलेल्या वचनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत आहोत. यावेळी देशाला आमची सर्वात जास्त गरज आहे. अनेक लोक भविष्याबद्दल संभ्रमात आहेत. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी मी खास चिंतेत आहे. आम्ही आमच्यामार्फत मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत.'