मुंबई (मुस्ताक शेख ) : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन आणि आवाहन स्वीकारून संयमाने जो प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल जनतेचे आभार. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी सरकारच्या योजना आणि संकल्पना जनतेपर्यंत पोहोचवून स्वत:सह प्रत्येकाने त्याचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येकाने देशासाठी समाजासाठी, स्वत:साठी व स्वत:च्या कुटुंबासाठी जबाबदारीने वागावे, नियमांचे पालन करावे असे आवाहन माजी मुख्यमंत्री, भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केले आहे.
खासदार नारायण राणे यांनी व्हीडिओ संदेशाद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, आज संपूर्ण जग, आपला भारत देश, महाराष्ट्र राज्य कोरोना व्हायरसच्या संकटातून जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या संकटातून देशाला सावरण्यात यशस्वी होत आहेत. त्यांच्या नियोजन आणि मार्गदर्शनामुळे जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारताची स्थिती खूपच चांगली आहे. पंतप्रधानांनी २१ दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय असून या काळात घराबाहेर पडू नका. तसे केल्यास स्वत:चे आणि देशाचे संरक्षण आपण करू शकतो. देशाला कोरोना व्हायरस प्रसारापासून वाचू शकतो. त्यामुळे कर्तव्य समजून प्रत्येकाने या प्रसंगाला सामोरे जावे. नियमांचे पालन करावे असे, आवाहनही खा. राणे यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशासाठी १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्याबद्दल खासदार नारायण राणे यांनी त्यांचे आभार मानले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्य आणि देशभर हा व्हायरस रोखण्यासाठी सुरू असलेल्या कामाचेही खा. राणे यांनी कौतुक केले.