अवघ्या ५ मिनिटांत होणार कोरोनाचे निदान; सरकारची किट्सला मंजुरी

कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. ब-याचदा कोरोना झालेली व्यक्ती लवकर समजत नाही. कारण त्या व्यक्तीमध्ये लक्षणे प्राथमिक टप्प्यात सामान्य सर्दी आणि खोकल्यासारखी असतात. कोरोनाचे निदान करणा-या किट्सची अनेक देशांमध्ये मागणी असून, भारतही ही किट्स जर्मनीकडून सध्या विकत घेतो. विशेष म्हणजे कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची तपासणी करणारे किट्स आता अमेरिकेने विकसित केले आहे.


काही दिवसांपूर्वी भारतातल्या पुण्यातल्या कंपनीने ६ आठवडे संशोधन करून १०० टक्के स्वदेशी बनावटीचे किट तयार केले. पुणेस्थित मायलॅबने आठवड्यातून १ लाख किट निर्मिती करण्याचे आश्वासन दिले असून, एका किटने १०० रुग्णांची तपासणी करता येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. विशेष म्हणजे देशातल्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनेही याला मान्यता दिली आहे.



आता अमेरिकेतल्या ट्रम्प सरकारनेही या किट्सच्या वापराला परवानगी दिली आहे. किट्स फक्त ५ मिनिटांत रुग्णाला कोरोना झाला आहे की नाही, याचे निदान करणार आहे. अमेरिकेतली औषध निर्माता कंपनी अ‍ॅबॉटनेही हे किट तयार केले आहे. अमेरिकेतल्या रेग्युलेटर यूएसएफडीएनेही त्याला मंजुरी दिली आहे. पुढच्या आठवड्यापासून या किट्सच्या निर्मितीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

अ‍ॅबॉट कंपनीच्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा शोध घेण्यासाठी वापरलेले नमुने योग्य आढळले आहेत. यासाठी युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनची परवानगी मिळाली असून, जलद, पोर्टेबल, पॉईंट-ऑफ-केअरची तपासणी केली जाणार आहे. अ‍ॅबॉटचा दावा आहे की, पॉझिटिव्ह केसची माहिती अवघ्या ५ मिनिटांत कळू शकणार आहे. त्याच वेळी संबंधित व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असल्यास समजण्यासाठी १३ मिनिटांचा वेळ लागणार आहे.