शिर्डी साई संस्थानाकडून 51 कोटींची मदत

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर सरसावले आहेत. शिर्डी साई संस्थानाकडून 51 कोटींची तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून २ कोटींची आर्थिक मदत मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍याचा निर्णय घेण्यात आला आहे.



मुंबई  (प्रतिनिधि): एकीकडे कोरोना व्हायरसविरूद्धच्या लढ्यात लोक घरात राहून सहकार्य करत आहे तर दुसरीकडे सरकार देखील सर्वोतपरी मदत करत आहे. क्रीडा व चित्रपटातील अनेक कलाकारांनी पंतप्रधान मदत निधी आणि मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीसाठी आर्थिक मदत केली आहे. याच पार्श्‍वभूमीवर साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍थेच्‍या वतीने या संकटाचा सामना करण्‍यासाठी 51 कोटी रुपयांचा निधी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍याचा निर्णय घेतला आहे.राज्यासह देशभरात कोरोना व्हायरसने गुणाकार करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 136 वर पोहोचली आहे. गुरुवारी (26 मार्च) दिवसभरात 22 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर आज सकाळी नागपूरमध्ये चार आणि गोंदियात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून कोरोनाविरोधातील लढाईसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दोन कोटींची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दीड कोटींची मदत दिली जाणार आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी ५० लाखांची मदत दिली जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याची मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.



  • मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून दोन कोटींची मदत जाहीर

  • राष्ट्रवादीचे आमदार, खासदार, पदाधिकारी एक महिन्याचं वेतन केंद्र सरकारच्या मदतनिधीला देणार

  • शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार

  • पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांच्या फंडातून कोरोना प्रतिबंधात्मक उपायासाठी 50 लाखाचा निधी जाहीर

  • कोरोनाविरोधी लढ्यासाठी 'बजाज' ग्रुपकडून 100 कोटींची मदत तर युनिलिव्हरकडूनही 100 कोटींची मदत देण्याची माहिती

  • मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे कोरोनाविरोधातील लढाईसाठी मुख्यमंत्री निधीला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय

  • मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधीला प्रत्येकी 25 लाखांची मदत केली आहे

  • साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 लाखांची मदत केली


देशभरात कोरोनाबाधितांची संख्या 700 वर पोहोचली आहे. त्यापैकी 16 जणांचा मृत्यू झाला असून 45 उपचारांनी बरे झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे.