लढा! कोरोनाशी | दानशूर रतन टाटा यांच्याकडून तब्बल 1500 कोटींची मदत जाहीर

टाटा समुहाचे प्रमुख रतन टाटा यांनी कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी टाटा ट्रस्टतर्फे 1500 कोटींची मदत जाहीर केली आहे.


मुंबई (प्रतिनिधि ): कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकार आणि प्रशासन रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. आता सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींही याला हातभार लावत आहेत. याच पार्श्वभूमीवर दानशूर व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी टाटा ट्रस्टतर्फे 500 कोटींची मदत जाहीर केली होती. यानंतर काही वेळातचं टाटा सन्सने आणखी एक हजार कोटी रूपयांचा निधी देण्याची घोषणा केली. म्हणजे एकूण दीड हजार कोटी. टाटा समूहाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात अपार आपुलकी आहे, ती त्यांच्या या देशप्रेम आणि दानशूरपणामुळेच. ही मदत कोरोनाबाधितांसाठी असणार आहे. टाटा ट्रस्टने एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे. यापूर्वी आनंद महिंद्रा, अनिल अगरवाल यांनीही पुढाकार घेत मदत केली आहे.



कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या संकटाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने 15 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं आहे. तर, या काळात कोणी उपाशी राहु नये म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 1 लाख 70 हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली. अन्नसुरक्षा आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाला थेट पैसे देण्याची योजना केंद्र सरकारने घोषित केली. देशात कुणालाही उपाशीपोटी झोपण्याची वेळ येऊ देणार नाही, तसेच खिशात पैसे नाहीत अशी अवस्था असणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.